मनाचे श्लोक

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री रामदासस्वामिंचे श्री मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू ।
नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥

सदा सर्वदा प्रीति रामी धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥
देहेदुःख ते सूख मानीत जावे ।
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥
मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले ।
त्यासारखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥

मना मानसी दुःख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥
विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगी ।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥ १३ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।
परी शेवटी काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥

मना वासना चूकवी येरझारा ।
मना कामना सोडि रे द्रव्यदारा ॥
मना यातना थोर हे गर्भवासी ।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥

मना सज्जना हीत माझे करावे ।
रघूनायका दृढ चित्ती धरावे ॥
महाराज तो स्वामि वायुसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

न बाले मना राघवेवीण काही ।
मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥

मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥

देहेरक्षणाकारणे यत्न केला ।
परी शेवटी काळ घेऊन गेला ॥
करी रे मना भक्ति या राघवाची ।
पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥
रघूनायकासारिखा स्वामि शीरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।
पुढे देखता काळ पोटी थरारी ॥
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे ।
बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥
पुरी वाहिली सर्व जेणें विमानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥


No comments:

Post a Comment